चिखली (जि. बुलडाणा) : सियाचीनमध्ये सीमेवर खडापहारा देणारा चिखलीतील लष्करी जवान एक वर्ष कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने खाली कोसळला आणि त्यातच त्याला वीरमरण आले. या घटनेने संपूर्ण चिखली दु:खात बुडाले आहे.



हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अशा दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे २ ऑगस्ट २०२० पासून १०-महार बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांची सियाचीनमधील एक वर्षाची ड्यूटी १ ऑगस्टला संपली. ते सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येणार होते.


कैलास सहकाऱ्यांसह सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. दरम्यान, खाली उतरत असताना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरून घसरत खाली कोसळले. सोबत असलेल्या जवानांनी त्यांना तेथून उपचारासाठी लडाखच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान १ ऑगस्टला कैलास पवार याची प्राणज्योत मालवली.


पवार कुटुंबीयांचा हंबरडा


कैलास यांच्या अशा अनपेक्षित जाण्याने पवार कुटुंबावर दु:खाचा हिमालयच कोसळला आहे. घरातील मंडळी, नातलग आणि मित्रपरिवार शोकाकुल आहेत. जवान कैलास पवार यांच्या पश्चात आईवडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्टला चिखली येथील तालुका क्रीडासंकुलात सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.