JEE Main 2021 Exam : जेईई परीक्षेच्या चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 26, 27, 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार आहे.



jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे. या वेबसाईटवर भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन नंबर भरायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

जेईई मेन्सच्या तिसऱ्या सत्रासाठी या आधी 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार होत्या, तर चौथ्या सत्रासाठी परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येणार होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून तिसऱ्या सत्रासाठी आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे तर चौथ्या सत्राच्या तारखांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार सत्रामध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी चार संधी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील, त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.


अर्ज भरताना या वर्षी विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सद्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल, याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे.